बेंगळुरू: कर्नाटकातील एच.डी. कुमारस्वामी सरकारवरील संकट काही केल्या कमी होताना दिसत नाही. सत्ताधारी काँग्रेस-जेडीएस आघाडीच्या १३ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर कुमारस्वामी मंत्रिमंडळातील मंत्री आणि अपक्ष आमदार नागेश यांनीही आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आता कुमारस्वामी सरकारमधील सर्वच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कुमारस्वामी सरकार संकटात सापडले आहे. या आमदारांचे राजीनामे मंजूर झाल्यास कुमारस्वामी सरकार अल्पमतात येऊन ते कधीही कोसळू शकते, अशी चर्चा रंगली आहे.
बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरमैय्या व मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि उपमुख्यमंत्री जी परमेश्वरन यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या काँग्रेसच्या १० तर जेडीएसच्या ३ आमदारांनी शनिवारी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला होता. या १३ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर अपक्ष आमदार व मंत्री नागेश यांनीही आज आमदारकीचा राजीनामा दिला. उद्या मंगळवारी कर्नाटक विधानसभेत या आमदारांच्या राजीनाम्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या आमदारांचे मन वळविण्यासाठी काँग्रेस-जेडीएसचे नेते प्रयत्न करत आहेत. तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपदे दिली जातील तसेच तुमच्या मतदारसंघांना विशेष निधी दिला जाईल, अशा अनेक ऑफर्स मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी या आमदारांना दिल्या असल्या तरी आमदारांनी मंत्रिपदाची ऑफर धुडकावली असून आपण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे. या १४ आमदारांचे राजीनामे मंजूर झाल्यास २२४ सदस्य संख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेची संख्या २१० होईल. त्यामुळे बहुमतासाठी ११३ ऐवजी १०६ सदस्य संख्या लागेल. १४ आमदारांचा राजीनामा मंजूर झाल्यावर कुमारस्वामी सरकारच्या आमदारांची संख्या केवळ १०४ (विधानसभा अध्यक्ष सोडून) होईल. त्यामुळे कुमारस्वामी सरकारला बहुमतासाठी दोन आमदारांची आवश्यकता निर्माण होईल